रविवार, २५ डिसेंबर, २०११

शांतिनिकेतन-१

एवीतेवी बंगालमध्ये आलोच आहोत तर इथली काही ठिकाणे चुकवायची नाहीतच असे ठरवले होते (वर्ग सोडून ;) ) त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे गुरुदेवांचे शांतिनिकेतन (गुरुदेव म्हणजे फक्त रबिन्द्रनाथ ठाकूर). जरा माहिती काढली तर असे कळले की २३ डिसेंबरपासून पौष मेला चालू होतोय. हा चान्स सोडायचा नाहीच असे ठरवलेच होते.
कसे जायचे वगैरेची माहिती मित्राकडून व जालावरुन घेतली.
खडगपूर-बोलपुर (शांतिनिकेतन) हा निदान ५ तासाचा रेल्वे प्रवास आहे. हावडावरुन काही ट्रेन्स आहेत. पण खडगपूरहुन फक्त बेंगलोर-गुवाहाटी एक्सप्रेस जाते. लवकर पोहचावे म्हणून मी हावडा-बोलपुर असे एका ट्रेनचे तत्काल आरक्षण केले होते. हावड्यास पोचण्यासाठी मला सकाळी ५.३० ची लोकल पकडणे किंवा ६ ची एक्सप्रेस गाडी पकडणे असे दोन पर्याय होते. सकाळी ३.३० चा गजर लावून मस्त झोपलो, गजर झाला आणि नेहमीप्रमाणे ५ मिनिटं असं म्हणून परत झोपलो. उठतो तर ५.१५ वाजलेले. सगळ्या प्लॅनचा बोर्‍या झालेला. कारण थोडेफार तरी आवरुन जवळपास सायकल रिक्शा मिळून स्टेशनला पोहचायला निदान ६.१० तरी झालेच असते. म्हणजे काहीही करुन मी हावड्यावरुन माझी ट्रेन पकडू शकणार नव्हतो. :(
एकमेव पर्याय म्हणजे सकाळी ८.३० (आयआरसीटीसी टाईम)ची गुवाहाटी एक्सप्रेस पकडणे. ८ वाजता स्टेशनला पोचून तिकीट वगैरे काढले आणि प्रतिक्षा करत थांबलो.  फलकावर गुवाहाटी एक्सप्रेसची ८.४५ आगमन वेळ व ८.५० गंतव्य वेळ दिसू लागली. तोपर्यंत पुरी-भाजी असा नाश्ता करुन घेतला. ८.४५ ची गाडी आली ८.५० ला आणि सुटली चक्क ९.३० ला. आधीच काय कमी उशीर झाला होता म्हणून अजुन उशीर! जनरलचा डबा हुडकून बसायला गेलो तर कळले की तो डबा व त्याला लागून असलेला आणखी एक डबा फक्त सेनेच्या जवानांसाठी आहेत. शेवटी एकदाचा सिव्हिलियन्ससाठीचा असलेला जनरल डबा हुडकून त्यात उभा राहिलो. ५ तास उभे राहून प्रवास करायची मानसिक तयारी केलीच होती. पण कपड्यांवरुन जरा जंटलमंटल दिसणार्‍या या जीवाची काळजी वाटून बसण्यापुरती एक जागा मिळवून दिली. त्याबदल्यात त्याला ऐकणार्‍याचा कान मिळाला ;) निदान २ तास त्या माणसाने केरळमध्ये आपण काय काम करतो, कसे राहतो इ.इ. रंजक माहिती दिली. रबराच्या झाडाचे बी कसे असते हेदेखील दाखवले.
हावडा स्टेशनवर गाडी अर्धा तास थांबते. तेवढ्या कालावधीत अपेक्षेप्रमाणे भरपूर गर्दी डब्यात शिरली. आणि गाडी गुवाहाटीकडे कूच करु लागली. काही वेळाने एका माणसाला बोलपुर कधी येते असे विचारले असता त्याने जोरदार धक्का दिला, की म्हणे गाडी बोलपुरला थांबतच नाही!!! कितीही अभ्यास केला तरी शेवटच्या क्षणी कुणीतरी अशी काही हवा करतो आणि आपला आत्मविश्वास डळमळीत होऊन जातो. इथे अगदी तसंच घडलं. मग माझे मित्रांना फोन चालू झाले. पण शनिवार असल्याने एकतर बिझी होते किंवा उचलतही नव्हते. शेवटचा उपाय म्हणून मिपाकर वल्ली यांना फोनवून योग्य ती माहिती मिळवण्यात आली. बोलपुर आले तेंव्हा दुपारचे २ वाजले होते. हवेत मस्त गारवा होता.
सायकल रिक्षाने परिसराचा फेरफटका मारुन ५.३७ च्या परतीच्या ट्रेनने हावड्याला येणे किंवा तिथे राहणे असे दोन पर्याय ठेवून जरा मापे काढली.
रिक्षावाल्यालाच गाईड बनवून शांतिनिकेतनचा परिसर पालथा घालायला सुरुवात केली. बोलपुर स्टेशनपासून अंदाजे २ किमी अंतरावर विश्वभारती विश्वविद्यालयाचा परिसर सुरु होतो. अत्यंत रमणीय अशी ही जागा आहे

१. गुरुदेवांच्या बंधूंचे घर
२. हिंदी भवनः


. चिनी भाषा भवन
४. पाठभवन (इथे विश्वभारतीमधील सर्व विषयांची पाठ्यपुस्तके लिहिली जातात)



५. प्रशासकीय भवन:

६. आम्रकुंज (या जागी अजुनही इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग भरतात. सर्व मुले जमिनीवर बसुनच शिकतात)

७. गुरुदेवांनी इथे भराव टाकून जे रोपटे लावले, त्याचा आज महावृक्ष झाला आहे.

८. या जागी बसून गुरुदेवांनी अनेक कविता लिहिल्या. (मॄणालिनी कुटी)


९. काचमहाल (हा बंद असल्याकारणाने फारशी माहिती मिळू शकली नाही आणि गाईडचे हिंदी अतिशय महान असल्याने त्याने जे सांगितले ते कळले नाही)


१०. गुरुदेवांचे निवासस्थान. इथे गुरुदेव व इतर ५ कुटुंबांनी निवास केला

११. छातिमतला: शिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्याला इथे पुस्तकात झाडाचे पान घालून देऊन निरोप दिला जातो (दीक्षांत समारंभ)
अश्या रितीने परिसर पाहणे झाले. एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिथले संग्रहालय बंद असल्याने ते पाहता आले नाही. त्या संग्रहालयात गुरुदेवांच्या अनेक वस्तू प्रदर्शनास ठेवल्या आहेत. ते जर खुले असते तर मी नक्कीच राहिलो असतो.
४ वाजत आले होते. हावड्याला जाऊन खडगपूरची ट्रेन पकडायची झाल्यास ५.३७ ची रेल्वे चुकवणे बरोबर नव्हते. त्यामुळे लगेचच जाऊन तिकीट काढले. सकाळच्या नाश्त्याशिवाय पोटात काहीच नसल्याने मस्तपैकी ब्रेड-आम्लेटवर ताव मारला, चहा पिला व परतीच्या प्रवासाला लागलो.
(टीपः अजुनही बरेच फोटो आहेत, पण वेगळा धागा काढणार आहे. तिथला कलाविभाग हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. त्याला या धाग्यात टाकणे मला अन्यायकारक वाटत आहे.)


७ टिप्पण्या:

  1. मुळात बंगाल हा प्रांत आपल्या काहीश्या जिव्हाळ्याचा ..त्यातून साक्षात गुरुदेव आणि त्यांनी उभारलेला हा वटवृक्ष ... उभ्या आयुष्यात शांतीनिकेतन ला किमान एकदा तरी भेट देण्याची इच्छा आहे.. आता हे वाचून आणि फोटो पाहून हि ओढ काहीशी तीव्र झालेय आणि योग जुळून येण्याची वाट न पाहता त्वरित अंमलबजावणी कशी करता येईल हे पाहणारे .... बाकीचे फोटोज दुसरीकडे प्रसिद्ध झाले कि लगेच कालवा :)

    उत्तर द्याहटवा
  2. वा,वा वा… मी सुद्धा हे फ़ोटोज़ पाहिले नव्हते अज़ून… छान पैकी प्रवास आणि त्याहून छान त्याचे वर्णन…
    By the way - रबरा च्या झाड़ाचे एक-दोन बिया ठेवून घेतल्या कि नाही? हल्ली रबर खूपच महाग होत चाललंय हो…

    उत्तर द्याहटवा
  3. saral,sadhe,pan prawahi lekhan. photo surekh.hindi bhavan cha ajun changala photo asel tar pathav.

    उत्तर द्याहटवा
  4. mast

    sundar pravas varnan mast photos mastach

    keep it up :)

    bhet dyayachi ichha hotey shantiniketan la

    उत्तर द्याहटवा
  5. गाढवा (राग नको मानू अस म्हटल म्हणून) अरे स्वतःच्या गलथानपणाच वर्णन इतक व्यापक आणि प्रत्यक्ष तिथलं, तिथे आलेले अनुभव याचे वर्णन इतकं त्रोटक. फोटो छान आले आहेत रे. तिथली माहिती थोडी अजून सविस्तरपणे दे रे.

    उत्तर द्याहटवा
  6. Good one!!!
    Please elaborate more about your stay, because the story has beginning an incomplete middle and no end!!!!

    Photos are good!!!!

    I remembered 2 Books of our favorite writer Pu.La. Deshpande, Vangachitre & Mukkam Post Shantiniketan.

    Cheers!!!

    उत्तर द्याहटवा