सायकली काढून सगळेच टांग टाकून हॉस्टेलकडे. गप्पा नेहमीच्याच; मॅडमच्या कॉमेंट्स आणि पुढच्या आठवड्यात करायच्या असाईनमेंट्स. काय करायचे, कोणी करायचे याचा थांग नसतो.
बाकीचे डीपार्टमेंट्सचे विद्यार्थी तोपर्यंत बाहेर पडलेले असतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या कलरचा ड्रेस घालून आलेला असतो. ड्रेसचे रंग, डीझाईन्स यामुळे डोळे सुखावतात; काय पण मनुष्याचा चमत्कार आहे!!! विचारांचे घोडे या दोन विषयांच्या पुढे जातच नाहीत.
ढग दाटून आलेले असतात, अंधार पडायच्या बेतात असतो. पावसाचे चिन्हही कधी दिसत नाही, अंगाची आणि जीवाची काहिली मात्र नेहमीचीच. बाजूनेच एखादी गाडी जाते. कुठल्यातरी प्रोफेसरचीच असणार, नाहीतर इथे कोणत्या स्टुडंटकडे फोर व्हीलर येणार? तंद्रीतच सायकल चालवत असतो. तरीपण कुणाचाही अपघात वगैरे होत नाही
नाश्ता करुन परत खुराडेवजा खोलीत परत. लॅपटॉप चालू करुन तोंड खुपसुन बसतो. एका छोट्या खिडकीतून मोठ्ठे जग माझ्या डोळ्यांनी बघत असतो.