शनिवार, २२ जानेवारी, २०११

अमृतानुभव

मित्रहो,
आज (२१ जानेवारी) स्प्रिंग फेस्टचा पहिला दिवस. सकाळपासूनच विविध वर्कशॉप्सची रेलचेल होती. सकाळी काही कुठे गेलो नव्हतो; पण संध्याकाळी मात्र "अनुभव"(फ्युजन संगीत मैफल) ला जायचेच असे ठरवले होते. दुपारी कॅमेरा घेऊनच बाहेर पडलो होतो.
कॉन्सर्टला पंडित विश्वमोहन भट येणार असल्याने त्याला माझ्या लेखी विशेष महत्त्व होते. संध्याकाळी ५ वाजता असणारी कॉन्सर्ट ६ वाजता चालू झाली. प्रचंड मोठ्ठी रांग बघून मला आत जायला मिळेल की नाही याची चिंता लागली होती. रांगेतच एक मित्र गाठ पडल्याने रांगेत मध्येच घुसणे शक्य झाले. (देवा, अशी किती पापे घडवणार आहेस तू माझ्या हातून???) प्रचंड गोंधळ, धक्काबुक्की यातून तावून सुलाखून आत घुसलो एकदाचा!! एक पायरी तरी पार पडली होती.




नाऊ द स्टेज इज सेट फॉर एक्शन!




पडदा उघडला, आणि कर्मा bandचे आगमन झाले. मी फोटो काढायच्या गडबडीत असल्याने कलाकारांची नावे नाही कळली. सर्वच कलाकार अत्यंत सुरेख परफोर्मर्स होते. भारतीय वाद्यांमध्ये तबला, घटम ही वाद्ये होती. पाश्चिमात्य वाद्यांमध्ये ड्रम, बेस गिटार, इलेक्ट्रिक व्हायोलीन आणि की बोर्ड ही वाद्ये होती. आणि त्यांच्याबरोबर होते आपल्या मोहन वीणे सह पंडित विश्वमोहन भट.
कार्यक्रमाची सुरुवात यमन रागाने झाली. अत्यंत सुरेख अश्या "एरी आरी पिया बिन" या पारंपारिक बंदिशीने झाली. काय तो वाद्यमेळ! केवळ अप्रतिम. संध्याकाळची वेळ, मस्त थंडी आणि जोडीला यमन! अमृतानुभवाची हीच नांदी होती.
त्यानंतर राग झिंझोटी रागातील तुकडा सादर करण्यात आला. झिंझोटी बद्दल जास्त माहिती नाही त्यामुळे लिहिता येत नाहीये. आता याबद्दल काहीतरी श्रवण करावे लागेल.
या सगळ्यात वेळ कसा गेला ते कळतच नव्हते. यानंतर एक वेगळाच प्रयोग करण्यात आला. सहसा भैरवी राग शेवटी सादर केला जातो. यांनी भैरवीला मध्येच स्थान दिले. भैरवीतील "बाबुल मोरा नैहर छुटो जाये" हे बंदिशवजा गाणे सादर करण्यात आले. हे गाणे मी कुंदनलाल सैगलच्या स्ट्रीट सिंगर या चित्रपटात बघितले होते, ऐकले होते. अनेकदा ७२ आर पी एम च्या तबकडीवर सुद्धा ऐकले होते. त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
सैगलच्या आवाजातील गाणे आपल्याला http://www.youtube.com/watch?v=w_BmHDD8rSM इथे बघायला मिळेल.
इथे मात्र माझी थोडी निराशा झाली. सैगल, भीमसेन जोशी यांच्या आवाजातील ही बंदिश ऐकून सवय असल्याने असेल कदाचित! शेवटी गांधीजींनी आफ्रिकेत आणि बिग ब्रदरच्या पंचतारांकित घरात शिल्पा शेट्टीने अनुभवलेला वर्णभेद एकच, पण मन हेलावते ते गांधीजींच्या अनुभवानेच. तसेच काहीसे मला वाटले. सैगल पेटी घेऊन रस्त्यावरून फिरताना त्याची जी अगतिकता जाणवते ती मात्र इथे जाणवली नाही.
यानंतर वेळ होती अजून एका देखण्या अशा हंसध्वनी रागाची.
काहीही माहित नसूनही का कुणास ठावूक, हंसध्वनी राग मला फार आवडतो. पहिला सूर लावल्या लावल्याच लक्षात आले, की माझी आवडती "जा तोसे नाही बोलू कन्हैय्या" ही बंदिश सुरु होणार. देवाने द्यायला सुरुवात केली की झोळी फाटेस्तोवर देतो असं म्हणतात ते काही खोटे नाही. संपूर्ण दीड तास प्रचंड चांगले काहीतरी ऐकायला मिळावे हा सुद्धा त्यातलाच एक भाग.
मैफल संपली ती रघुपती राघव राजा राम या भजनाने. खरंच अप्रतिम भजन.
प्रसन्न मुद्रेतले पंडित विश्वमोहन भट स्वाक्षऱ्या देताना:


असा अमृतानुभव मिळायला खरंच भाग्य लागते का? हा प्रश्न मात्र माझ्याकरता अनुत्तरीतच आहे बर मित्रांनो. जर तुमच्यापैकी कुणाला गवसले असेल तर खरंच सांगाल ना मला.......

गुरुवार, २० जानेवारी, २०११

माझा सुंदर कॅम्पस

मंडळी,

आज सकाळी लेक्चर नंतर जवळच्याच क्रायोजेनिक डीपार्टमेंट च्या बागेतल्या फुलांचे फोटो काढायचे हे ठरवलेलं होतं. सकाळी डीपार्टमेंटला पोहोचताच कळाले की आज लेक्चर होणार नाही म्हणून. मग तर आनंदाला पारावार राहिला नाही. कॅमेरा काढून लगेच्च फुलांकडे मोर्चा वळवला आणि काही फुलांना कॅमेऱ्यात कैद करून टाकले कायमचे! या फुलांची नावे माहित नाहीत; तज्ञ वाचकांनी पामराच्या ज्ञानात भर टाकावी अशी विनंती.












































शनिवार, १५ जानेवारी, २०११

धुके


आज शनिवार असूनही लवकर उठावे वाटले. डोळे किलकिले करून खिडकीतून बाहेर डोकावले. बाहेर धुक्याशिवाय काहीच दिसेना. अनेक दिवसांनंतर धुके दिसल्याने आपोआपच मन प्रसन्न झाले. बोचऱ्या थंडीतही बिछान्यातून बाहेर यावे वाटले तेंव्हाच जाणवलं की आजचा दिवस काही औरच आहे. आवरून लगेच कॅमेरा बाहेर काढला आणि चाललो कॅम्पसमधील वाट तुडवीत. मस्तपैकी धुके अंगावर घेत असाच निघालो. काही फोटो काढले ते डकवेन लगेचच.
धुक्याने चांगलेच वेधले होते कॅम्पसला. १० फुटाच्या पुढचे काहीच दिसत नव्हते. गाडीचे दिवेपण लक्षात येण्यास बराच वेळ जात होता, इतके दाट धुके मी आजवर कधी बघितलेले स्मरत नाही. का कुणास ठावूक आपण आयुष्याची वाटही अशीच धुक्यात चालाल्याप्रमाणे चालत असतो. भविष्यात काय घडणार आहे हे आपल्याला आधी थोडेच माहित असते? एक ठराविक पल्ला आपल्याला दिसत असतो. पण नंतर काय? हे पुढे गेल्यावरच समजते.
दंवाचे थेंब पानांवरून ओघळत टपटप आवाज करत खाली पडत होते. एरवी याच रस्त्यावर, याच वेळेस किती लोक ये-जा करत असतात, गाड्या, सायकली इत्यादी वाहनांचे आवाज किती काय काय असतं. आज हे काहीच दिसत नाहीये. धुक्याच्या दुलईत सगळेजण गाढ झोपी गेले असतील का? का मऊमऊ दुलईत पडूनच धुक्याकडे बघत असतील?

हा रस्तापण आज किती वेगळा दिसतोय! पाऊस पडून गेल्यासारखा ओला झालाय. पण पाऊस तरी कुठे आहे?अकस्मात कुठून तरी जमिनीवर पडणारा एक दवाचा थेंब कधी येतो हो जमिनीवर? कधी पकडू शकतो का आपण? आयुष्यात काही लोक येतात आणि असेच नकळत आपल्या मनाचा एक कोपरा, अलगद, हळुवारपणे ओला करून जातात. हे क्षण तरी कुठे कळतात? पण इफेक्ट कळतोच ना!
तर अशी ही धुक्यात हरवलेली सकाळ किती छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी शिकवून गेली आज!