मंगळवार, १७ मे, २०११

खरगपूर ची खादाडी - १ (टिक्का)

टिक्का

खडगपूर रेल्वे स्टेशनावरून आय.आय.टी. कॅम्पस मध्ये आल्यावर एका वेगळ्याच विश्वात आल्यासारखे वाटते. मी जेंव्हा इथे आलो, तेंव्हा एक नाव सारखे कानावर पडत होते: टिक्का रेस्तराँ.

भर चौकात असल्यामुळे एक फेमस खूण म्हणून, स्पोर्ट्स ग्राउंडला लागून असलेले, गर्ल्स होस्टेल जवळ असल्याने सर्वांना सुटेबल असा मीटिंग पोईंट म्हणून टिक्का अनेक जणांच्या ओळखीचे आणि लाडके असे ठिकाण आहे. अनेकांच्या मोबाईलवरचे संभाषण “(आतुरतेने)कहां मिलना है? (लाडिक आवाजात)टिक्का पे मिलते है ना! (निश्वास)ओके, ठीक है” या वाक्यावर संपते.

टिक्का ची वैशिष्टे एवढ्यावरच थांबत नाहीत. सर्वात प्रथम वैशिष्ट्य म्हणजे याचा मालक; ज्याचे नाव माहिती करून घ्यायचे असेल तर बहुदा तिथे वेटर म्हणून काम करावे लागेल असे वाटते; कारण आजतागायत हा माणूस नेहमीच्या गिऱ्हाईकांशीसुद्धा बोलताना दिसलेला नाही. एका पोस्टल कर्मचाऱ्यांप्रमाणे आलेल्या गिऱ्हाईकाला कुपने देणे हेच काम करताना दिसतो. अर्थात त्याचे व्यवस्थापन कौशल्य दांडगेच आहे. ती त्याची कुपन देताना हिशेब करायची लकब, अत्यंत विचित्र असा आवाज हा आधी आधी मनोरंजक वाटायचा. (आता सवय झाल्यामुळे जास्त अप्रूप वाटत नाही!)

दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी दर! मला तर खडगपूर मधून बाहेर आल्या नंतरच भारतात महागाई असल्याचा साक्षात्कार होतो आणि मी छे, काय महाग आहे सगळ! असं म्हणत पाहिजे ते खरेदी करत असतो.

टिक्का कडे मिळणारे सगळे पदार्थ हे एका ठराविक किमतीच्या पट्ट्यात मिळतात. इथे रु. २.५, ३, ४, ५, १०, १२ आणि १५/- इतक्याच किमतीची कुपने दिली जातात. जे काही पदार्थ आहेत ते याच cost bracket मध्ये आहेत. यामुळे इथे शाळेतल्या लहान मुलांपासून ते इथला शिक्षकवर्गही येतो. हा इतका स्वस्त दर आपल्याला नवीनच असतो (इथे येण्यापूर्वी!)

तिसरे वैशिष्ट्य म्हणजे ambience! प्रशस्त असे आवार ही टिक्काची जमेची बाजू. पावसाळ्यातले दिवस सोडले तर एरवी तुम्ही इथे आभाळाच्या छत्रीखाली बसून टिक्का मधल्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. अगदी पाराखाली बसून चहा पिण्याचे सुख तुम्ही इथे अनुभवू शकता. सकाळच्या वेळेस चहाबरोबर गप्पा मारण्यासाठी अनेक आजोबा लोक्स इथे येतात आणि आपला दिवस सार्थकी लावतात. कदाचित टिक्का हा त्यांच्या आयुष्यातालाच एक भाग आणि उतारवयातली एक बाग बनली असेल.

टिक्का मध्ये महाराष्ट्राच्या मातीची आठवण करून देणारा पदार्थ म्हणजे पुरी गुगनी. (गुगनी म्हणजे मटार उसळ) आता याचा महाराष्ट्राशी काय संबंध? असे वाटले असेल ना; सांगतो थांबा. एक तर हा पदार्थ फक्त आणि फक्त सकाळी मिळतो. दुपारी मिळत नाही. हे वैशिष्ट्य मला कोल्हापूरच्या मिसळीशी साधर्म्य दाखवते.(अस्सल कोल्हापुरी मिसळ ही फक्त आणि फक्त सकाळी मिळते.) आणि पुलंच्या कृपेने (की अवकृपेने?) पुणेकरांच्या सुखाचा परमोच्च बिंदू म्हणून मटार उसळ डोळ्यापुढे येते.

बंगाल मध्ये येऊन रसगुल्ला न खाणे म्हणजे केवळ मूर्खपणा. आणि टिक्का वर येऊन असा मूर्खपणा म्हणजे साक्षात करंटेपणा. सकाळी सकाळी इथे यावे. थंडी असेल तेंव्हा मस्तपैकी चहाचा घुटका घेऊन आधी थंडीला अंगाबाहेर काढावे. मग मस्तपैकी गुगनी-पुरी सोबत रसगुल्ले खाऊन पोटोबा तृप्त करावा आणि मग निवांत आपल्या कामाला लागावे. उत्तम दिनचर्येचा हा एक नमुना होऊ शकेलही.

टिक्काचा ग्राहक वर्ग असा विविध वयोगटातला आहे, समोरच केंद्रीय विद्यालय असल्याने तिथून येणारी कच्चीबच्ची, दुपारच्या रणरणत्या उन्हात रिक्षा चालवून पोट भरणारे सायकलरिक्षावाले, शिक्षक, रिसर्च स्कोलार्स, संध्याकाळच्या वेळेस येणारे इतर विद्यार्थी ग्रुप, खेळाची प्रक्टिस करून येणारे खेळाडू अशा एक ना दोन, वेगवेगळया लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था टिक्काने सांभाळली आहे. कितीतरी लोकांना टिक्का हा आधार आहे. कितीतरी लोकांच्या आठवणीतला वडाचा पार आहे!